वांगे अमर रहे...!

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture
प्रकाशीत: 
(वांगे अमर रहे पुस्तकात प्रकाशित)

वांगे अमर रहे…!

                 कॉलेज संपवून शेती करायला गेलो तेव्हा गावातील इतरांकडे नाही ते ज्ञान आपल्याकडे आहे असा माझा दृढ समज होता आणि त्याच आविर्भावात मी शेतीची सुरुवात केली. या सर्व जगाच्या लेखी मूर्ख असलेल्या शेतकर्‍यांना स्वानुभवाने शहाणे करण्यासाठी भरघोस उत्पन्न घ्यायचे ठरविले. दोन महिन्यांत नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून वांगीची निवड केली आणि ५ एकरात वांगीची लागवड केली. मेहनत,जिद्द सर्वस्व पणाला लावलं. मेहनत फळा आली. भरघोस पीक आलं. अन्य शेतकरी घेतात त्याच्या १-२ नव्हे चक्क ५-६ पट उत्पादन मिळालं. आणि इथेच माझे ग्रह फिरले.
               माझी वांगी बाजारात गेली आणि स्थानिक बाजारात वांगीचे भाव गडगडले. ५ रुपयाला पोतं कुणी घेईना. वाहतूक,हमाली,दलाली वजा जाता जो चुकारा मिळाला ते पैसे बसच्या तिकिटालाही पुरले नाहीत. शेतात घेतलेली मेहनत आणि वांगी फुकटात गेली. असे काय झाले? काहीच कळत नव्हते. प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे माझ्या नजरेत इतर शेतकरी अडाणी,मूर्ख असल्याने त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी निष्कर्ष निघाला की मार्केटमध्ये गरजेपेक्षा जास्त माल गेल्यामुळे भाव पडले. कारण ग्राहकाला जेवढी गरज असेल तेव्हढीच तो खरेदी करेल. माझी वांगी खपावी म्हणून ग्राहक पोळी, भात, भाकरीऐवजी नुसतीच वांग्याची भाजी खाऊन पोट थोडीच भरणार आहे? स्थानिक बाजारात गरज, मागणीपेक्षा जास्त माल गेल्याने ही स्थिती झाली त्याला जबाबदार मीच होतो. इतर शेतकर्‍यांनी सायकलवर आणलेली अर्धा पोतं वांगी सुद्धा माझ्या मुळे बेभाव गेली होती. सायकलवर अर्धा पोतं वांगी आणून उदरनिर्वाह करणारे माझ्यामुळे अडचणीत आले.
            झाली चूक पुन्हा करायची नाही म्हणून दुसर्‍या खेपेस वांगी आदिलाबादला न्यायचे ठरवले. माझ्या गावाहून १५० किमी अंतरावर मोट्ठी बाजारपेठ असलेले आंध्रप्रदेश मधील आदिलाबाद शहर. ६० पोती वांगी न्यायची कशी? स्पेशल वाहनाचा खर्च परवडणार नव्हता म्हणून माल बैलबंडीने हायवे क्रं. ७ पर्यंत नेला. रायपुर – हैदराबाद जाणार्‍या ट्रकला थांबवून माल भरला. तिथे हमाल किंवा कुली नव्हताच त्यामुळे मीच ट्रकड्रायव्हरच्या मदतीने माल चढविला. ६० पोती प्रत्येकी वजन ५०-५५ किलो. अनुभव नवा होता. मजा वाटली (?) शेतकरीcumहमाल.Two in One.
आदिलाबाद गाठले.
तिथल्या मार्केटची गोष्टच न्यारी. मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.
वांगेच वांगे.
अत्र तत्र सर्वत्र वांगेच वांगे.
जिकडे तिकडे चोहीकडे, वांगेच वांगे गडे, आनंदी आनंद गडे.
मार्केट वांग्यांनी भरलं होतं. त्या संदर्भात एका शेतकर्‍याला विचारले.
“यंदा हवामान वांगी साठी फारच अनुकूल असल्याने वांगीचं भरघोस उत्पादन आलंय.” तो शेतकरी.
“भाव काय चाललाय?” माझा प्रश्ऩ.
“सकाळच्या लिलावात ५-६ रुपये भाव मिळाला.” तो शेतकरी.
“किलोला की मणाला?” माझा प्रश्ऩ.
“किलोला? अरे यंदा किलोला विचारतो कोण? पोत्याचा हिशेब चालतो.” तो शेतकरी.
“म्हंजे? पोतभर वांगीला ५-६ रुपये?” माझा प्रश्ऩ.
“पोतभर वांगीला नाही, पोत्यासहित पोतभर वांगीला.” तो शेतकरी.
“रिकाम्या पोत्याची किंमत बाजारात १५ रुपये असताना पोत्यासहित पोतभर वांगीला ५-६ रुपये? “मी मलाच प्रश्न विचारीत होतो. हे कसं शक्य आहे? 
"१५ रुपये किंमतीच्या रिकाम्या पोत्यात ५०-५५ किलो वांगी भरली की वांगीसहीत पोत्याची किंमत घटून ती ५ रुपये एवढी होते" हे समिकरण मला कुणी शिकवलंच नव्हतं.
विश्वासच बसेना, पण समोर वास्तव होतं. 
“आता लिलाव केव्हा होईल?” माझा प्रश्ऩ.
“इथे नंबरवार काम चालतं, मी काल आलो, माझा नंबर उद्या येईल कदाचित.” तो शेतकरी.
“तोपर्यंत वांगी नाही का सडणार?” माझा प्रश्ऩ.
         यावर तो काहीच बोलला नाही. मूक होता. डोळे पाणावले होते, एवढ्या मेहनतीने पिकविलेलं वांगं सडणार म्हटल्यावर त्याचा जीव कासावीस झाला होता.
आता माझ्याही मनात कालवाकालव व्हायला लागली.
        आपला नंबर तीन दिवस लागला नाही तर अर्धी वांगी नक्कीच सडणार. डोळ्यादेखत वांगी सडताना पाहणं मानसिकदृष्ट्या पीडादायक ठरणार होतं. मी मनातल्या मनात गणित मांडायला सुरुवात केली. तीन दिवसात किमान अर्धी वांगी नक्कीच सडणार. उरलेली ३० पोती गुणिला ५ वजा तीन दिवस जेवणाचा, निवासाचा खर्च बरोबर उणे पंधरा ( -१५) म्हणजे वांगी विकण्यासाठी मला जवळून १५ रुपये खर्च करावे लागणार होते.
काय करावे मला सुचत नव्हतं, डोकं काम करीत नव्हतं, माझं सर्व पुस्तकी ज्ञान उताणं झोपलं होतं.
आता पुढे काय?
निर्णय घेतला. एकदा डोळेभरुन त्या वांगीकडे पाहिलं. गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावी अशी. ते दृश्य डोळ्यात साठवलं, एका झटक्यात वांगीकडे पाठ फिरविली आणि गावाचा रस्ता धरला. गावाजवळ आलो तेव्हा दिवस उतरणीला आला होता. आणि आता मला एका नव्या समस्येने ग्रासले होते. गावांतील शेतकरी मला यासंदर्भात विचारतील त्याला उत्तर काय द्यायचे? मूर्ख शेतकर्‍यांच्या नजरेला नजर भिडविण्याचे धाडस विद्याविभूषित शहाण्याकडे उरले नव्हते. मग एका चिंचेच्या झाडाखाली विसावलो. तेथेच टाईमपास केला. गावातील सर्व लोक झोपी गेले असतील याची खात्री झाल्यानंतरच गुपचिप चोरपावलाने गावात प्रवेश केला.
आजही मला दिसतात.
..ते ..वांगे..
गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावे असे, अजूनही न सडलेले.
आणी माझ्या दृष्टिपटलावर अमर झालेले.
                                                          गंगाधर मुटे
………… **…………..**…………..**…………..**………….

दिनांक : ११-०२-२०११

मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
लेखन स्पर्धा २०१० या स्पर्धेत "वांगे अमर रहे...!"
या लेखाला पारितोषक मिळाले आहे.

माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत. Wink

………… **…………..**…………..**…………..**………….

प्रतिक्रिया

  • kalyan's picture
    kalyan
    November 01, 2014 09:35 AM

    HERE ONLT FARMER IS DOING WRONG, INSTEAD OF SELLING IN WHOLE SALE MANDI, IF BRIJAL FARMER WILL CAARY DAILY 5 TO 10 BAGS WITH A TROLLEY AND SELL DIRECTLY ON ROAD , THEN HE WILL BE VERY MUCH BENIFITED. OR THE FARMWER DIRCLTY MUST HAVE HIS OWN SHOP FOR SELLING , FARM PRODUCTS. THEN FARMERS WILL GET RIGHT MONEY AND PROFIT.
    NOTE: THEY SHULD SELL DIRECTLY TO CONSUMERES.

    KALYAN RAO MOHARIR.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    November 01, 2014 10:04 AM

    शेतकर्‍यांनी काय करायला पाहिजे हे सांगताना तेच सांगीतले गेले पाहिजे, जे शेतकर्‍याला माहीत नसते.
    तुम्ही म्हणताय हे तर सर्वांनाच माहीत आहे.

    शेतीचा प्रश्न इतका सहज सोपा असता तर केव्हाच निकाली निघाला असता ना?

  • गंगाधर एम मुटे's picture
    गंगाधर एम मुटे
    March 25, 2015 09:03 PM

    सोमवार, 23 मार्च 2015 - संतोष सिरसट - सकाळ वृत्तसेवा - बातमी
    तीन टन काकडीची पट्टी चक्क चार रुपये!
    वडाळ्यातील शेतकऱ्याचा मुंबईतला अनुभव; भाजपच्या काळात शेतकऱ्यांना "बुरे दिन‘

    सोलापूर - केंद्रात व राज्यात "अच्छे दिन‘चे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मात्र "बुरे दिन‘ आले आहेत. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील एका शेतकऱ्याने मुंबईत तीन टन काकडी विकली. मात्र, त्याची पट्टी चक्क चार रुपये आली आहे.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या आश्‍वासनांची खैरात करत केंद्रात सत्ता मिळविली. तशाच प्रकारे राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासनांच्या बळावर सरकार स्थापन केले. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या बळावर ही दोन्ही सरकारे स्थापन झाली. मात्र, उद्योगधार्जिन्या असलेल्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये असमाधानाची भावना निर्माण झाली आहे.
    राज्यात उसाचा हंगाम मोठा असतो. त्या हंगामातही शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन फक्त दीड हजार रुपये भाव दिला जात आहे. सरकार एफआरपीप्रमाणे दर देण्याचा तगादा लावत आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील कारखान्यांवर फौजदारी दाखल करण्याचा इशारा देत आहेत. मात्र, हंगाम संपत आला तरीही शेतकऱ्यांना केवळ दीड हजार रुपयांवरच समाधान मानावे लागत आहे. आघाडी सरकारच्या काळात मागील वर्षी उसाला प्रतिटन जवळपास अडीच हजर रुपये भाव मिळाला होता. केंद्र व राज्य सरकारने केवळ लोकांना "अच्छे दिन‘चे गाजर दाखविल्याच्या प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील एका शेतकऱ्याने 17 मार्चला मुंबईच्या बाजारात काकडी विक्रीसाठी नेली होती.
    काकडीचे वजन जवळपास तीन टन दोन किलो भरले. त्या काकडीला 10 हजार 647 रुपये आले. पण बाजारपेठेत विक्रीसाठी नेलेल्या काकडीला आडत, हमाली, मोटारभाडे, तोलाई या सगळ्यांसाठी 10 हजार 643 रुपये खर्च झाले. त्या शेतकऱ्याच्या हातात चक्क चार रुपये शिल्लक राहिले.
    काकडीचे उत्पादन घेण्यासाठी लाखो रुपये खर्च झाला असेल. मात्र, बाजारात काकडी विक्रीसाठी नेल्यानंतर त्याची घोर निराशा झाली. यावर सरकार काहीच करू शकत नाही का? असा प्रश्‍न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे. ऊस, काकडी, वांगी या मालाची कवडीमोल दराने विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतून रित्या हातानेच परतावे लागत आहे.
    *********

    माझ्या शेतात वांगी आहेत. गुरुवारी (ता. 19)

    मी पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डात 74 किलो वांगी पाठविली होती. त्या वांग्याची खर्च वजा जाता केवळ 13 रुपये पट्टी माझ्या हातात आली आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागत आहे. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्या सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्यापासून वाचविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
    - प्रशांत भोसले, शेतकरी
    -----------------------------------------------------
    तात्पर्य व प्रश्न :
    १) शेतकर्‍यांना ढोबळी मिरची, काकडी, कलिंगड अथवा तत्सम पिके लावून अधिक उत्पादन घेण्याचा अनाहूत भाकड सल्ला देऊन शेतकर्‍याला सापळ्यात लटकवणार्‍या "उंटावरच्या शहाण्यांनी" यापासून बोध घ्यावा.
    २) आता बुडला तर तो फ़क्त शेतकरीच बुडला आहे. सारे सल्लागार मात्र शाबूत व मजेत आहेत.
    ३) झिरो बजेट शेती करणार्‍यांना माल वाहतूक व शेतमाल विपणनाचा खर्च येत नाही का? जर येत असेल तर "झिरो बजेट शेती" सारखे अर्थहीन शब्द वापरून सल्ले वाटत फ़िरणे म्हणजे वेल क्वालिफ़ाईड बुवाबाजी, भोंदूगिरी नाही का?
    ४) अधिक उत्पादन घेतल्याने अथवा झिरो बजेट शेती केल्याने शेतीचे प्रश्न सुटतात अशी श्रद्धा बाळगणे म्हणजे वेल क्वालिफ़ाईड प्रमाणीत अंधश्रद्धा नाही का?

    - गंगाधर मुटे
    --------------------------------------------------