शेतमालाचे भाव वाढले की
आमचा जळफळाट होतो...कारण
आमच्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण
आमच्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंसाठी
किंमत मोजायचीच नसते
आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी
कधी मरेल हा रावण
तुमच्या-आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?
रावणी मनोवृत्तीचे दहन व्हावे
अशी बाळगू ‘अभय’ इच्छा
नंतरच देऊ एकमेकांना
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!
- गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
Ravindra Kamthe
मुटे सर,
माझ्या ही अगदी अशाच भावना मी एका कवितेतून व्यक्त केल्या होत्या
|| दसरा ||
चला करूया,
आपण साजरा,
हसत हसत,
आज हा दसरा ||
दहन करुनी,
स्व-मधील रावणाचे,
करूयात ज्वलन,
आज दुर्गुणांचे ||
लुटूयात सोने,
माणुसकीचे,
स्नेह आणि प्रेम,
हेच लेणे त्याचे ||
चला करूया,
आपण साजरा,
हसत हसत,
आज हा दसरा ||
*****
आपला
रविंद्र कामठे
गंगाधर एम मुटे
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!