नाचू द्या गं मला (लावणी)
गेली रोहिणी, मिरूग आला, आल्या पावसाच्या धारा
थेंब टपोरे चोळी भिजविती, पदर खेचतो वारा
कुलीनघरची जरी लेक मी, मला बंधात जखडू नका
जाऊ द्या गं मला पावसात अडवू नका
भिजू द्या गं मला पावसात अडवू नका
नाचू द्या गं मला पावसात अडवू नका ...॥धृ०॥
कोरस :- वेल कोवळी नवथर भेंडी, हिला पिंजर्यात दडवू नका
नाचू द्या गं हिला पावसात अडवू नका
कडकड करुनी विजा नाचती
गडगड गर्जन मेघ गर्जती
तरी जरा ना भिती वाटते
झंकार सुरांचे कानी दाटते
पाय थिरकण्या पुलकित करिती
देई टाळी मोर आणिक मयुरी ठुमका ..... ॥१॥
या जलधारा मस्ती करोनी
थेंब मारिती नेम धरोनी
सर्वांगाशी झोंबीत सारा
गुदगुली करितो अवखळ वारा
नसानसातुनी उधाण वाहे
गिरक्या घेते तरी ना थकते, मी नाजुका .....॥२॥
जाऊ एकली नकोच रानी
आई वदली हळूच कानी
घडे असे का मला न कळते
तनामनातुनी काय सळसळते
तरी खेळू द्या अभयाने मज
या धारांच्या पुढती सारा, अमृतघटही फ़िका ..॥३॥
गंगाधर मुटे 'अभय’
..................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
...................................................................
प्रतिक्रिया
गंगाधर मुटे
फेसबूक लिंक - १४/१२/२०१४
https://www.facebook.com/gangadharmute/posts/930986870259335