हल्ली अनेक कवी गझल लेखनाकडे वळले आहेत. अरबी, फारशी, उर्दू अशी होत होत गझल मराठीत आली. मराठीपूर्वी ती हिंदी व गुजराथीत आली. पूर्वीची गझल ही शराब आणि शबाब ह्या विषयाभोवतीच घुटमळत होती. आता ती विविधांगी बनत चालली आहे. जनजीवनातील अनेक सत्ये परखडपणे गझलेमध्ये मांडली जात असताना गंगाधर मुटे सारखे मातब्बर, कर्तबगार, प्रॅक्टिकल अनुभवी कवी गझलेच्या प्रेमात पडले व त्यातून व्यक्तिगत अनुभव अवलोकन व चिंतन याद्वारे सृजनशील लेखणीतून सत्य मांडण्यात शतप्रतीशत यशस्वी झाले व साकारला गझलसंग्रह "माझी गझल निराळी".
आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाचं चिंतन त्यांनी आपल्या गझलेत ओतलं तेव्हा वाचकाला त्यातील यथार्थता पटते. हेच मुटेंच्या यशस्वी गझलेचं गमक आहे.
उदा.
"गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने"
ज्यांच्या गझलांना सुधाकर कदमांची (पुणे) प्रस्तावना, भीमराव पांचाळेंचे पाठबळ, प्रदीप निफ़ाडकर, प्रमोद देव(मुंबई), स्वामी निश्चलानंद(अरुणाचल प्रदेश) यांच्या कौतुकाची छाप मिळावी त्या गझलांवर माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीने तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणाऱ्या ह्या गझलावर चार शब्द लिहिणे ही केवळ औपचारिकताच.
"दिसतात अभय येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठिण झाले"
स्वलेखनाने स्वानंदा सोबत परमार्थही साधावा बघा हा शेर
"आनंद भोगताना परमार्थही साध्य व्हावा
असलेच कार्य कर तू दोहे मला म्हणाले"
कर्म और भाग्यका किताब है जिंदगी, पाप और पुण्य का हिसाब है, जिंदगी जेव्हा कर्म करताना भाग्य फळाला येते तेव्हा आपसूकच नशीब फळते.
"प्राक्तन फिदाच झाले यत्नास साधतांना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळतांना"
भारतातील सद्य परिस्थितीचे वर्णन खालील शेरामध्ये बघा. सर्वांना नोकरी हवी मग शेती कुणी करायची असा काहीसा आशय.
निघून गेलेत शहाणे सर्व साहेब बनायला
मूर्ख आम्ही येथे उरलो, मोफत अन्न पिकवायला
धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी
श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे
"कोणीतरी यांची आता पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे"
"लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे बत्तीस तारखेला"
"सोकावलेल्या अंधाराला इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण दीप आज जळला पाहिजे"
"चला वापरा एकदा आणि फेका हवी ती खरीदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ हृदय भासते मेड इन चायना"
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर?
"शेती करून मालक होणेच मूर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी"
जास्तीत जास्त शरीर उघडे टाकून कमीतकमी वस्त्र वापरण्याच्या ’फॅशन’वर आसूड ओढताना मुटे म्हणतात
"ललना पाहून कपडे शरमले
मते पाहताच नेते नरमले"
भ्रष्टाचारावरही श्री मुटे आसूड ओढून लिहितात की, ही व्यवस्थाच किडली आहे
"टाळूवरील लोणी खाण्यास गुंतला जो
सत्कारपात्र तोची मशहूर थोर झाला"
"सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात
चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद"
गझलकार श्री मुटे यांना पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा.
- तुळशीराम बोबडे
अकोला
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------