माझ्या वाङ्मयशेतीत आपले सहर्ष स्वागत आहे.
नमस्कार मित्रहो..
ही माझी छोटीसी दुनिया…
माझ्या छोट्याशा दुनियेत आपले मन:पूर्वक स्वागत..
मित्रहो,
तीन हजारच्या आसपास लोकसंख्या असलेलं एक माझं छोटसं गाव. जन्म आणि बालपण येथेच गेलेलं. महाविद्यालयीन शिक्षण व त्यानंतर मार्केटिंग क्षेत्रात नोकरी करताना थोडाफ़ार काळ शहरात गेलेला. पण काही अपरिहार्यतेमुळे पुन्हा गावाकडे पावले वळली आणि येथे स्थायिक झालो तो कायमचाच.
कविता,गाणी व भजने लिहिण्याची बालपणी खुप आवड होती. मजा वाटायची, आनंद लुटायचो पण बालपण संपायच्या आतच ’भाकरीचे प्रश्न’ निर्माण झालेत आणि ’भाकरीचा शोध’ घेता-घेता उरलेलं बालपण,तरुणपण यांची पुरती वाट लागली, अगदी जळून राख झाली. आणि त्यासोबतच कविता,गाणी व भजने लिहिण्याची ऊर्मी,प्रेरणा कुठे व कशी गहाळ झाली ते कसे म्हणून कळलेच नाही.
“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली, तारुण्य जळताना.”
अशी ’आयुष्य कोमात’ गेलेली अवस्था दोन-चार वर्षे नव्हे तर चक्क दोन तपाला पुरून उरेल एवढा काळ कायम होती.
काळाच्या प्रवाहात भाकरीचा प्रश्न सुटला. आयुष्यात जे जे हवे ते ते मिळाले. पण कविता करण्याची प्रेरणा मात्र करपूनच गेली होती. मी कवितेला अन कवितेने मला पूर्णतः: एकमेकांना विसरलोच होतो.पाऊलखुणा सुद्धा उरल्या नव्हत्या. याजन्मी भेटगाठ होईल असेही वाटलेच नव्हते कधी.
एका अर्थाने आयुष्य संपलेच होते.
* * * * *
पण …..
पण आयुष्याने पुन्हा एकदा कोलांटउडी घेतली आणि "नव्हत्याचे होते" झाले. दोन तपाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मी पुन्हा लिहिता झालो.
मित्रहो,
मी हाडाचा ना कवी ना लेखक.
मी आहे एक हाडा-मांसा-रक्ताचा शेतकरी.
शेतकरी कुटुंबात जगतांना मी जे काही पाहिलं, अनुभवलं,
काही माझ्या वाट्याला आलेली माझी अनुभुती, माझी अभिव्यक्ती, त्यासोबतच काही इतरांच्या वाट्याला आलेल्या व्यथा; पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या.
ते बरं-वाईट वास्तव प्रामाणिकपणे चितारण्याचा प्रयत्न करतोय.
आपल्या मर्यादा सांभाळून व्यक्त होण्याची एक धडपड करतोय.
त्यासोबत काही न उलगडलेली उत्तरे शोधायचा प्रयत्नही करतोय.
हे जग फार झपाट्याने बदलत आहे, संगणकीय तंत्रज्ञानाने गरूड झेप घेतली आहे. जीवन जगण्याच्या परिभाषा बदलत आहेत, विकास आणि विलासाच्या व्याख्या बदलत आहेत.
मात्र दुर्दैवाने ही सर्व विकासाची परिमाणे बिगरशेतीक्षेत्रातच तेवढी बदलत आहेत. बहुसंख्येने असणारा शेतकरी समाज व इतर कष्टकरी समाज अजूनही अंधारातच चाचपडत आहे, विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा कल्पना केवळ वल्गना ठरत आहेत.
मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो, कांदा न भाकरी
हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायची गरज आहे पण ....
जोडे सजावटीला एसी कपाट ते
भाजी-फळास जागा मात्र उघड्यावरी
ज्या देशाची ध्येयधोरणे बिगरशेतीउद्योगाला पूरक आणि शेतीला मारक असतील आणि वरून "कृषिप्रधान देश" म्हणून डंका पिटला जात असेल त्या देशात गरिबी आणि अठराविश्व दारिद्र्य यांचेच अमाप पीक येणार हे उघड आहे.
* * * * *
मी कवी नाही कारण कविता लिहायला लागणारी प्रतिभा आणि कल्पनाविलास माझ्याकडे नाही.
मी लेखक नाही कारण लेखनकौशल्य आणि साहित्यिक दर्जा माझ्याकडे नाही.
आणि तरीही लिहिण्याचा प्रयत्न करतोय..
कारण मला आता शेतीच्या दुर्दशेला वाचा फोडायची आहे.
या प्रचलित व्यवस्थेने धुत्कारलेल्या आणि माणूस म्हणून माणसासारखे जीवन जगण्याचा अधिकार नाकारलेल्या शोषित समाजाच्या व्यथांना चव्हाट्यावर मांडायचे आहे.
मी काय लिहितो, कसे लिहितो, याचे मला भान आहे. माझे लेखन बहूसंख्यजनांना न रुचणारे, न पटणारे किंवा अनाकलनीय असू शकते, याची मला जाणीव आहे. कधीकधी तर क्रित्येकाच्या भावना दुखावणारे, तडाखे,चटके देणारे असू शकते, हेही ज्ञात आहे मला. पण नाईलाज आहे, वास्तव हे कटू असले तरी ते वास्तव असते, आणि मी ते टाळू शकत नाही. लेखन करतो म्हणून लेखक आणि कविता लिहितो म्हणून कवी, एवढंच माझं लेखक व कवी या शब्दांशी नातं. एरवी लेखक, कवीसाठी लागणारी योग्यता माझ्यात आहे किंवा नाही, मलाच संशय आहे. कारण मी कल्पनाविलासात फार काळ रमू शकत नाही. लोकांना रुचावे, दाद मिळावी, आपल्याला वाहवा मिळावी म्हणून त्या तर्हेने लेखन करण्याचे जाणूनबुजून मी प्रयत्न करू शकत नाही.
वाचक, रसिक, समीक्षक हा लेखकाच्या दृष्टीने देव असतो हे मान्य, पण त्यांचे फ़ाजिल लाड पुरविलेच पाहिजे, याबाबत मी सहमत होऊ शकत नाही. याउलट गरज असेल तेथे त्यांना दोन खडे बोल ऐकवण्याची कठोरता माझ्यात असायलाच हवी, यावर मी ठाम आहे. लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे एवढ्यासाठी मी लिहू इच्छित नाही. केवळ उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणे, सीमित म्हणा की संकुचित म्हणा, पण एवढाच उद्देश माझ्या डोळ्यासमोर असतो, हे खरे आहे.
* * * * *
मुळातच शेतकरी समाज मुका आहे. त्याला स्वतःला व्यक्त होण्याची संधीच मिळत नाही. आर्थिकस्थितीने पुरेपूर परावलंबी असल्याने इतरांना जे रुचेल तेच बोलण्याखेरीज त्याला पर्याय उरत नाही. त्याला बोलण्यापूर्वी पहिल्यांदा परिणामांचा विचार करावा लागतो. कर्ज देणे थांबवेल म्हणून सावकार किंवा बॅंकाच्या विरोधात बोलू शकत नाही. उधारीवर किराणा मिळणे बंद होईल म्हणून व्यापार्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. ७/१२ चा उतारा मिळायला त्रास जाईन म्हणून प्रशासनाच्या विरोधात बोलू शकत नाही आणि पुढार्यावाचून तर बरेच काही अडते, मग त्यांच्या विरोधात बोलायची तो कशी काय हिंमत करू शकेल? अन्यायाने कितीही मर्यादा ओलांडल्या तरी..... त्याला त्याच्या मनातली खदखद जिभेवर आणताच येत नाही. सर्वांना रुचेल असेच बोलणे, हीच परिस्थितीची गरज असल्याने त्याला स्वतःची अशी भाषा उरतच नाही.
परिणामांची तमा न बाळगता एखाद्याने स्वतःला व्यक्त करायचे ठरवलेच तर तसे व्यासपीठच उपलब्ध नाही. शेतकर्याकडे जो कोणी येतो तो त्याला ऐकवायलाच येतो, त्याचे ऐकायला कोणीच येत नाही. कृषिविभागाच्या किंवा राजकीय पक्षाच्या मेळाव्यांत तो केवळ श्रोता असतो. कागदावर लिहून पाठवले तर गैरसोयीचे असल्याने वृत्तपत्रही शेतकर्यांचे मनोगत छापण्याची हिंमत दाखवत नाही. पुस्तक लिहायचे तर छपाईचा खर्च परवडण्यासारखा नाही. रेडियो-टीव्ही यांना तर एकंदरीतच शेती या शब्दाची ऍलर्जी आहे. मग शेतकर्याने व्यक्त व्हायचे तरी कसे? अभिव्यक्ती व्यक्त करताच येत नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून-नसून काय उपयोगाचे?
पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. शासन, प्रशासन आणि समाज यांनी नव्हे तर नियतीने व नव्या तंत्रज्ञानाने ती संधी शेतकर्यांना उपलब्ध करून दिली आहे. इंटरनेटने आता अल्पशा खर्चात अगदी दुर्गम प्रदेशातील आम माणसाला सुद्धा थेट जगाच्या नकाश्यावर आपली छाप सोडण्याची नामी संधी मिळवून दिली आहे. अगदी नाममात्र खर्चात आता इंटरनेटच्या माध्यमातून करोडो शेतकरी, जाती-पाती, धर्म-पंथ, स्त्री-पुरूष, देश-प्रांत या सर्व भेदाभेदाच्या सीमा ओलांडून एकाच वेळी एकाच व्यासपीठावर एकत्र येणे सहज शक्य झाले आहे.
तंत्रज्ञानाने गरूडझेप घेतली आणि सूर्य-चंद्र, मंगळ-अमंगळ तारे मनुष्याच्या टापूत यायला सुरुवात झाली. मात्र या कृषिप्रधान देशातला बहुसंख्य शेतकरी आणि एकूणच शेती हा विषय अडगळीत पडला आहे. विकासाच्या आणि प्रगतीच्या व्याख्येचे संदर्भ आणि अर्थ बदलत आहेत. शासनाच्या चुकीच्या आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती हा विषयच फारफार मागे ढकलला गेला आहे.
शेतकर्यांच्या अनेक पिढ्या उलटून गेल्या पण आमचा भैरू मात्र अजूनही कांदा-भाकर खाऊनच आला दिवस ढकलत आहे. त्याच्या न्याहारीचा 'मेनू' बिघडल्या घड्याळाच्या काट्यासारखा आहे त्याच स्थितीत स्थिर असून त्यात काही फारसा बदल घडत नाहीये. हे चित्र बदलण्याची सक्त गरज आहे. शेतकर्यांच्या जीवनातले नैराश्य संपून चैतन्य निर्माण होण्यासाठी आणि शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडण्यासाठी प्रयत्न होण्याची नितांत आवश्यकता आहे. शेतीचे यतार्थ चित्रण करणारे आणि परिवर्तनाला भाग पाडणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे, असे आपल्याला वाटते. पण आपण म्हणतो की आम्ही मात्र लिहिणार नाही. ते इतरांनी लिहिले पाहिजे. आमचे आयुष्य जगलो आम्ही, आमच्या हालअपेष्टा भोगल्या आम्ही, आंदोलनात उतरलो आम्ही, तुरुंगाची हवा खाल्ली आम्ही, लाठ्यागोळ्या झेलल्या आम्ही आणि आम्ही म्हणतो की आम्ही लिहिणार नाही. ते कुणीतरी लिहावे. हे कसे शक्य आहे? हे कदापि शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मिती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढ्या प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत. आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. अस्सल आणि अभिजात लेखन करायला लेखनशैलीची गरज भासत नाही. बोबडेबोल जरी अस्सल आणि अभिजात असेल तर त्यात जिवंतपणा असतो व तो जिवंतपणाच त्या लेखनाला परिणामकारकता प्रदान करतो. लेखन करणे ही एक कला असते, हे मान्य; पण लेखनात कलाकौशल्य वगैरे वापरल्याने ते लेखन कलाकृतीकडे झुकते आणि मग ती कलाकृती वास्तविकतेपासून फारकत घेण्याची दाट शक्यता असते. कला ही कला असते आणि वास्तव हे वास्तव. त्यामुळे फारसा विचार करायची गरज नाही. जसे लिहिता येईल तसे आणि जसे जमेल तसे लिहायचा प्रयत्न शेतकर्यांनी करायलाच हवा.
उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणारे आजवर खूप झालेत. पण इतिहास असे सांगतो की, या तर्हेचे व्रत घेतलेली बरीचशी माणसे मध्येच भरकटली आणि शेवटी देवाच्या आळंदीची वाट चुकून चोराच्या आळंदीला पोचलीत. आणि त्यामागच्या अनेक कारणांपैकी ’‘लोकप्रियता मिळविण्यासाठी लेखनीचा वापर करणे" हे एक प्रमुख कारण आहेच आहे. एकदा का पुरस्कार/शासकीय मानमरातब किंवा लोकप्रिय होण्याची इच्छा मनात जागृत झाली की सर्वांना रुचेल, पसंतीस पडेल असे लेखन लिहिण्याकडे कल झुकलाच समजावा. मग कटू, कठोर, तडाखे देणारे, दुष्प्रवृत्तीवर घाव घालणारे लेखन जन्माला घालणारी लेखनी स्वत्वाच्या विनाशाकडे वाटचाल करायला लागलीच असे निर्विवाद समजावे. मग या आभासी जगाच्या भुलभुलैयात लेखणीची धार कधी आणि कशी बोथट झाली, याचा उलगडा भल्याभल्यांना होत नाही.
जी चूक इतरांनी केली, तीच चूक माझ्याकडून होऊ नये,एवढे बळ विधात्याने मला द्यावे, आणि या प्रवासात लोकप्रियता लाभली किंवा पुरस्कार वगैरे मिळाले तर आनंदच आहे, पण नाही मिळाले तरी त्यात खेद वाटण्यासारखे काहीच नाही, आपला मार्ग तेवढा महत्त्वाचा, तो भरकटू नये, हीच धारणा मरेपावेस्तोवर कायम राहावी, त्यात अंतर येऊ नये, एवढीच आंतरिक इच्छा आहे.
मित्रहो,
आपणास माझे काव्य आवडले तरी आणि
ना-आवडले तरीही प्रतिक्रिया अवश्य द्या…
गंगाधर मुटे
आर्वी छोटी,हिंगणघाट जि.वर्धा
,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,
प्रतिक्रिया
डॉ.कैलास गायकवाड
उपेक्षितांना हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
गंगाधर एम मुटे
आपण पहिले सदस्य आणि पहिले प्रतिसादक ठरले आहे. आपले खूप खूप अभिनंदन.
प्रमोद देव
मुटेसाहेब, आपला हा प्रकल्प उत्तमच आहे हे नि:संशय!
हे संकेतस्थळ बहरो,प्रसिद्ध पावो आणि बळीराजाच्या उपयोगी पडो अशी सदिच्छा व्यक्त करतो.
गंगाधर एम मुटे
या कामी आपले मोलाचे सहकार्य लाभेल याची आम्हास खात्री आहे.
राजे
अतिशय उत्तम प्रकल्प
अभिनंदन!
गंगाधर एम मुटे
धन्यवाद राजे.
योगेश मुंढे
मुटे काका,
अतिशय उत्तम प्रकल्प. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .

गंगाधर एम मुटे
धन्यवाद योगेश.
पुढील वाटचालीत तुमचापण हातभार लागावा, हि विनंती.
स्वामी संकेतानंद
शेतकर्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!
हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल हा माझा ठाम विश्वास आहे !
शुभेच्छा !!
पिंगू
मुटेकाका अतिशय छान आहे प्रकल्प. शेतकरी बंधूंना इथे मार्गदर्शन लाभो हीच सदिच्छा.
- पिंगू
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संस्थळ उत्तम बनले आहे. संस्थळासाठी हार्दिक शुभेच्छा.........!!!! -दिलीप बिरुटे
गंगाधर एम मुटे
स्वामी संकेतानंदजी, पिंगूजी, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर आपले स्वागत आहे.
प्रशांत कवळे
एक चांगला उपक्रम हाती घेतलाय आपण!
हार्दिक शुभेच्छा!
गंगाधर एम मुटे
आपले स्वागत आहे प्रशांतजी. या उपक्रमाचे यशापयश मात्र आपणा सर्वांवर अवलंबून आहें.
प्रसन्न केसकर
अश्या एका व्यासपीठाची खरेच गरज होती. मुठेसाहेबांनी ती जाणुन पाऊले उचलली यासाठी अभिनंदन आणि या प्रकल्पाला घवघवीत यश मिळावे, तो सुरु करण्यामागील सर्व उद्दिष्टांची पुर्ती व्हावी अशी शुभेच्छा.
प्रसन्न केसकर
बाळासाहेब घुले
मुटेकाका हार्दिक अभिनंदन.
गंगाधर एम मुटे
प्रसन्नजी, बाळासाहेब
आपले स्वागत आहे.
गिरधरपाटील
एक चांगला प्रयत्न.
गंगाधर एम मुटे
श्री गिरधर पाटील साहेब,
आपले स्वागत आहे.
आपल्या या क्षेत्रातील जेष्ठतेचा नक्कीच फायदा होईल, अशी खात्री आहे.
महादेव कापुसकरी
मुटे साहेब याना सप्रेम नमस्कार.
आपला हा उपक्रम अतिशय चान्गला असुन सामान्य शेतकर्याला आपन हे हक्काचे व्यासपीथ मिलवुन दिले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनन्दन सर...